स्वत:च्या अर्धांगिणीचा त्याने घोटला गळा

Foto

औरंगाबाद- माहेरी राहण्यासाठी आलेल्या स्वत:च्या पत्नीला मारहाण करुन तिचा गळा घोटून पतीने खून केला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. संगिता सुनील घोडके (२१, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती सुनील घोडके हा पसार झाला आहे. सिडको एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

चिकलठाणा भागातील सावित्रीनगरात गेल्या सात ते आठ महिन्यांपूर्वी संगिता आई-वडिलांकडे राहायला आली होती. त्यानंतर सुनील देखील शिर्डीहून तिच्यासोबत राहायला आला होता. काही दिवस संगिताच्या आई-वडिलांच्या घरात राहिल्यावर दोघांनी शेजारीच एक खोली भाड्याने घेतली होती. सुनील मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करायचा. त्यांना एक अडीच वर्षांची चिमुकली आहे. शनिवारी रात्री संगिता घरात एकटी असताना सुनील आला. मध्यरात्री त्याने घरगुती कारणातून बेदम मारहाण केली. तसेच तिचा गळा आवळून खून केला. यानंतर सुनीलने धुम ठोकली.

रविवारी सकाळी संगीता अजून झोपेतून कशी उठली नाही. म्हणून तिची आई शांताबाई रोजेकर या झोपेतून उठविण्यासाठी गेल्या. तेव्हा संगीताच्या तोंडातून फेस बाहेर आलेला होता. तर तिच्या डाव्या डोळ्याजवळ आणि पायाला ताजी जखम होती. याशिवाय तिच्या अंथरुणावर शौच देखील दिसून आली. त्यामुळे तिला कुटुंबियांनी तात्काळ घाटीत आणले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषीत केले. या घटनेची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर पोलिस नाईक भानुदास खिल्लारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, सुनील पसार असल्याने पोलिसांचा त्याच्यावर दाट संशय आहे. सायंकाळी संगिताच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. 

खूनाचे कारण गुलदस्त्यात....
चिकलठाणा येथील मुळच्या संगीताचा विवाह शिर्डीतील सुनील घोडकेसोबत झाला होता. सुनीलच्या त्रासाला कंटाळून ती आई-वडिलांकडे राहायला आली होती. पण सुनील देखील तिच्या पाठोपाठ औरंगाबादला आल्याने दोघेही गोडीने राहतील. म्हणून रोजेकर कुटुंबियांनी त्याला आश्रय दिला होता असे निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, सुनीलला पकडल्यानंतरच खूनाचे कारण समोर येईल अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली.